सालोड हिरापूरमध्ये ग्रामविकासाचा उत्सव; अभिनेते भारत गणेशपुरे यांचा एकजुटीचा संदेश
सालोड हिरापूरमध्ये ग्रामविकासाचा उत्सव; अभिनेते भारत गणेशपुरे यांचा एकजुटीचा संदेश
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
वर्धा तालुक्यातील सालोड हिरापूर ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामविकासाला चालना देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते व हास्यसम्राट भारत गणेशपुरे यांनी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला आणि ग्रामविकासासाठी सर्वांनी एकजुटीने व एकोप्याने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेहरू विद्यालयाच्या बँड व लेझीम पथकाच्या जल्लोषात भारत गणेशपुरे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. ग्रामपंचायत परिसरात विविध विकासकामांची पाहणी करण्यात आली. यावेळी आदर्श ‘आपले सरकार सेवा केंद्रा’चे लोकार्पण करण्यात आले.
तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत बांधलेल्या घरकुलाचा गृहप्रवेश सोहळा पार पडला. प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या रूफटॉप सोलर पॅनलचेही उद्घाटन करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या तेल घाणीच्या गृहउद्योग प्रकल्पाला भेट देऊन माहिती जाणून घेण्यात आली. तसेच महिला बचत गटांच्या स्टॉल्सलाही भेट देऊन त्यांच्या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले.
ग्रामपंचायत सभागृहात आयोजित सिकलसेल व अॅनिमिया मुक्त सालोड हिरापूर आरोग्य शिबिराचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांवर आधारित साकारण्यात आलेल्या थीमचे भारत गणेशपुरे यांनी विशेष कौतुक केले. तसेच जिल्हा परिषद कन्या शाळा व अंगणवाडी केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना भारत गणेशपुरे यांनी ग्रामविकास हा सर्वांचा विषय असून सर्वांनी एकजुटीने काम केल्यासच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी होईल, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद वर्ध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्यासह अनेक अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सालोड हिरापूर ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.